प्रकरण १ लोकसंख्या भाग १ : भौगोलिक कारणे लिहा
भौगोलिक कारणे लिहा : (प्रत्येकी ३ गुण)
maharashtra state board geography bhugol important questions and answers marathi medium
प्रकरण १ लोकसंख्या भाग १
(१) भारत लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यातून
जात आहे.
महत्त्वाचे मुद्दे : (१)
मृत्युदर कमी होण्याची कारणे (२) मृत्युदर कमी होण्याचे प्रमाण (३) जन्मदर कमी होण्याचे
प्रमाण (४) जन्मदर व मृत्युदर यांतील वाढती तफावत.
उत्तर
:
भारताचा मृत्युदर दिवसेंदिवस कमी होत आहे. वाढणारे उत्पन्न, उंचावलेले राहणीमान, तंत्रज्ञानाचा
विस्तार यांमुळे मृत्युदर दिवसेंदिवस कमी होत आहे. याच दरम्यान भारताच्या लोकसंख्येचा
जन्मदर कमी होत असला, तरी मृत्युदराच्या तुलनेत जन्मदर कमी होण्याचे प्रमाण कमी आहे.
त्यामुळे भारताच्या जन्मदर व मृत्युदर यांतील ही तफावत वाढत असून, भारताची लोकसंख्या
सतत वाढत आहे. म्हणजेच भारत लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यातून जात आहे.
(२) जगातील लोकसंख्या वितरण असमान असते. (मार्च २२)
/ महत्त्वाचे मुद्दे : (१)
प्राकृतिक घटकांतील विविधता (२) विविधतेतील अनुकूल व प्रतिकूल घटकांचे स्वरूप व प्रभाव
(३) लोकसंख्या केंद्रीकरणावरील व वितरणावरील प्रभाव.
उत्तर
: जगातील
प्रत्येक देशाची भौगोलिक रचना, हवामान, मृदा, पाण्याची उपलब्धता इत्यादी प्राकृतिक
घटकांत विविधता आढळून येते. लोकसंख्येच्या वितरणावर या सर्व घटकांचा प्रभाव पडतो. ज्या
प्रदेशात प्राकृतिक घटक अनुकूल असतात तिथे लोकसंख्या जास्त, तर ज्या प्रदेशात प्राकृतिक
घटक प्रतिकूल आहेत तेथे लोकसंख्या कमी आढळते. नदीची सुपीक मैदाने, किनारपट्टीचे प्रदेश,
आल्हाददायक हवामान अशा अनुकूल परिस्थितीत लोकसंख्या जास्त असते. मात्र त्याच वेळेस
जगातील काही प्रदेशांत तीव्र उताराचे पर्वतीय प्रदेश, अतिशीत किंवा अतिउष्ण प्रदेश,
सदैव बर्फाच्छादित प्रदेश किंवा पाण्याचे दुर्भिक्ष असणारे वाळवंटी प्रदेश आहेत तेथे
साहजिकच लोकसंख्या कमी आढळते. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून जगातील लोकसंख्या
वितरण असमान असते.
(३) लोकसंख्या वितरणावर प्राकृतिक घटकांचा परिणाम
होतो.
/ महत्त्वाचे मुद्दे : (१)
प्राकृतिक घटक (२) प्राकृतिक घटकांचा लोकसंख्या वितरणावरील प्रभाव (३) भूरूपे, हवामान,
पाण्याची उपलब्धता यांचा लोकसंख्या वितरणाशी संबंध (४) यथायोग्य स्थानिक व जागतिक उदाहरणे.
उत्तर
:
लोकसंख्या वितरणावर प्राकृतिक घटकांचा सर्वाधिक प्रभाव असतो. ज्या प्रदेशांत सुपीक,
सपाट मैदानी प्रदेश आहेत किंवा किनारपट्टीचे प्रदेश आहेत, अशा प्रदेशांत वाहतूक सुगमता,
शेती व्यवसायाची भरभराट आणि शेती - आधारित इतर व्यवसायांचा विकास होतो. यामुळे तेथे
लोकसंख्या घनता जास्त आढळते. उदा., नाईल नदीचे खोरे, भारतातील गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा
या नदी खोऱ्यांमधील सुपीक मैदानी प्रदेशांमुळे तेथे लोकसंख्या जास्त आढळते.
या
तुलनेत तीव्र उताराचे पर्वतीय प्रदेश किंवा अतिउष्ण, अतिशीत हवामानाचे प्रदेश किंवा
वाळवंटी प्रदेश जेथे पाण्याचे दुर्भिक्ष आढळते. या प्राकृतिक घटकांमुळे अशा प्रदेशात
लोकसंख्या कमी आढळून येते. उदा., रॉकी, अँडीज, हिमालय पर्वत प्रदेश, विषुववृत्तीय सदाहरित
वनांचा प्रदेश किंवा कलहारी, अटाकामा, सहारा वाळवंटी प्रदेश येथे लोकसंख्या कमी आढळते.
(४) लोकसंख्या वितरणावर राजकीय घटकांचा प्रभाव पडतो.
/ महत्त्वाचे मुद्दे : (१) देशाची फाळणी-निर्वासितांचे स्थलांतर (२) स्थिर राजकीय
व्यवस्था-संस्कृती विकास (३) अस्थिर राजकीय व्यवस्था कलह, दंगे, स्थलांतर, मृत्युदर
(४) यथायोग्य उदाहरणे.
उत्तर : लोकसंख्या वितरणावर जन्मदर, मृत्युदर व स्थलांतर हे घटक
परिणाम करतात. एखादया देशात खळबळजनक राजकीय बदल झाला, तर मोठ्या संख्येने लोकांचे स्थलांतर
होते. त्यामुळे त्या प्रदेशातील लोकसंख्या वितरणाचा आकृतिबंध बदलतो. याबाबतीत दोन प्रमुख
उदाहरणे म्हणजे (१) हिंदुस्थानची फाळणी झाल्याने पाकिस्तानमधून लाखो निर्वासित भारतात
आले. तसेच बांग्लादेशची निर्मिती होण्यापूर्वीदेखील तेथून मोठ्या संख्येने निर्वासित
भारतात आले. (२) एखादया प्रदेशातील राजकीय तणाव हादेखील त्या प्रदेशातील लोकसंख्या
कमी होण्यास कारणीभूत ठरतो. उदा., सिरीया, लेबनॉन, लिबिया या प्रदेशांत अलीकडच्या काळात
अत्यंत अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे अनेक लोकांनी युरोप व अन्यत्र देशांत स्थलांतर
केले. (३) या अस्थिर राजकीय घटकांबरोबरच काही देशांत विकेंद्रीकरणाचे शासकीय व राजकीय
धोरणही अवलंबण्यात येत आहे. उदा., रशियाच्या उत्तरेकडील सायबेरिया या प्रांतात लोकसंख्या
अत्यंत विरळ असल्यामुळे सायबेरियात जाऊन स्थायिक होणाऱ्या लोकांना रशियन सरकार प्रोत्साहनपर
भत्ते आणि अन्य सोयी-सुविधा पुरवत आहे. अशा प्रकारे लोकसंख्या वितरणावर राजकीय घटकांचा
प्रभाव पडतो.
(५) लोकसंख्या वितरणावर सामाजिक घटकांचा परिणाम होतो.
/ महत्त्वाचे मुद्दे : (१) जगातील प्रदेशनिहाय चालीरीती (२) बालविवाह (३) बहुपतिकत्व
किंवा बहुपलिकत्व (४) वारसाहक्काच्या विविध जागतिक प्रथा (५) यथायोग्य उदाहरणे.
उत्तर : जगातील वेगवेगळ्या देशांत वेगवेगळ्या सामाजिक रूढी आहेत,
त्यांचा परिणाम लोकसंख्येवर होताना दिसतो. भारतात अजूनही खेडोपाडी बालविवाह व लवकर
लग्न करण्याची पद्धत रूढ आहे. आफ्रिकेत काही समाजांत आजही बहुपतिकत्व अथवा बहुपत्निकत्वच्या
प्रथा आणि चालीरीती आहेत. या सामाजिक घटकांचा प्रभाव लोकसंख्या वाढीवर होताना दिसून येतो.
(६) जन्मदर कमी असूनही लोकसंख्या
वाढू शकते.
/ महत्त्वाचे मुद्दे : (१) संक्रमणाचा चौथा टप्पा (२) जन्मदर कमी (३) आर्थिक-
वैदयकीय विकासाची सर्वोच्च पातळी (४) मृत्युदरातही अत्यंत लक्षणीय घट (५) म्हणून लोकसंख्येत
अल्प असली तरी वाढ.
उत्तर : लोकसंख्या संक्रमणाच्या चौथ्या टप्प्यात जन्मदर अजून कमी
होत जातो. मात्र, असे असले तरी या कालखंडात लोकांचे राहणीमान उच्च दर्जाचे असते. देशाची
आर्थिक स्थिती सुधारते. लोक आपल्या आरोग्याबद्दल जागरूक असतात. त्यामुळे याच वेळेस
मृत्युदरही खूप कमी झालेला असतो. मात्र, या टप्प्यात जन्मदर कमी असूनही मृत्युदर त्याहीपेक्षा
कमी असल्यामुळे लोकसंख्या वाढते आणि ही वाढ खूपच अल्प किंवा कमी असते.
(७) लोकसंख्या घनता ही लोकसंख्या आणि क्षेत्रफळावर
अवलंबून असते.
/ महत्त्वाचे मुद्दे : (१) एकूण लोकसंख्या ही निव्वळ सांख्यिकीय संकल्पना (२)
लोकसंख्या घनता ही तौलनिक संकल्पना (३) लोकसंख्या व भूक्षेत्र यांच्या गुणोत्तरावर
घनता ठरते (४) घनतेमुळे भूक्षेत्रावरील लोकसंख्येचा दबाव कळतो.
उत्तर : लोकसंख्येच्या अभ्यासात एखादया प्रदेशाची निव्वळ लोकसंख्या
प्रादेशिक तुलनेसाठी वापरणे योग्य ठरत नाही. याला कारण प्रत्येक देशाचे क्षेत्रफळ हे
वेगळे असते आणि त्यामुळे लोकसंख्येच्या वितरणात प्रादेशिक तुलनात्मक अभ्यासासाठी क्षेत्रफळ
आणि लोकसंख्या यांचे गुणोत्तर मोजणे अत्यावश्यक ठरते. लोकसंख्या घनता म्हणजे प्रदेशाचे
क्षेत्रफळ आणि एकूण लोकसंख्या यांचे गुणोत्तर होय. म्हणजेच एकूण लोकसंख्येला एकूण क्षेत्रफळाने
भागल्यास जी संख्या येते ती त्या प्रदेशाची लोकसंख्या घनता दर्शवते. थोडक्यात, लोकसंख्या
घनता ही केवळ संख्या नसून ती त्या प्रदेशाच्या क्षेत्रफळावर अवलंबून असते.
(८) पर्वतीय क्षेत्रात लोकसंख्या
कमी असते.
/ महत्त्वाचे मुद्दे : (१) तीव्र उतार (२) प्रतिकूल हवामान (३) शेती व इतर व्यवसायांवरील
मर्यादा (४) वाहतूक सेवांची कमतरता.
उत्तर : पर्वतीय प्रदेशाचा उतार तीव्र असतो. पर्वत शिखर, खोल दऱ्या
अशा भूरूपांमुळे सलग, सपाट जमीन उपलब्ध नसते. पर्वतीय प्रदेशाची उंची जास्त असते, त्यामुळे
तेथील तापमान कमी असते. हिवाळे अतिशय तीव्र असतात. पर्वतीय प्रदेशात पाण्याची टंचाई
असते. शिवाय येथे शेती करणे शक्य नसते; कारण या प्रदेशात मृदेचे प्रमाण अत्यंत कमी
असते. उदरनिर्वाहाची अन्य साधनेही पर्वतीय प्रदेशात उपलब्ध नसतात.
शिवाय वाहतुकीच्या सोयीही पर्वतीय
प्रदेशात अभावानेच आढळतात. या सर्व कारणांमुळे पर्वतीय क्षेत्रात लोकसंख्या कमी असते.
(९) पश्चिम युरोपात लोकसंख्येची
घनता जास्त आहे.
/ महत्त्वाचे मुद्दे : (१) खनिजसंपत्ती (२) हूर- न्हाईन नद्यांची खोरी (३) अंतर्गत
जलवाहतूक (४) आंतरराष्ट्रीय व्यापार.
उत्तर : पश्चिम युरोपातील इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी या प्रदेशांत
विशेषतः न्हूर आणि हाईन नद्यांच्या आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित अशा क्षेत्रांत उदयोगधंदयांना
चालना मिळाली आहे. हा प्रदेश खनिजसंपत्तीने समृद्ध आहे. त्याचप्रमाणे येथे अंतर्गत
व आंतरराष्ट्रीय वाहतुकीमुळे व्यापारातही विकास झाला आहे. सौम्य हवामान हे देखील या
प्रदेशाचे वैशिष्ट्य आहे. या सर्व कारणांमुळे पश्चिम युरोपीय प्रदेशात लोकसंख्येची
घनता जास्त आहे.
(१०) जगातील लोकसंख्येचे वितरण असमान
आहे.
/ महत्त्वाचे मुद्दे : (१) भूरूपांतील विविधता (२) त्यांपैकी अनुकूल-प्रतिकूल
भूरचना (३) हवामानातील जागतिक वैविध्य (४) त्यांपैकी अनुकूल-प्रतिकूल हवामानाचे प्रदेश
(५) मृदा, वने, पाणी यांच्या उपलब्धतेतील फरक (६) आर्थिक विकास, दळणवळणाच्या सोयी यांतील
भिन्नता.
उत्तर : जगात विविध स्वरूपांची भूरूपे आढळतात. काही भागात उंच पर्वत
आहेत; तर काही भागात पठारे, सपाट मैदाने, वाळवटे व दलदलीचे प्रदेश आहेत. पर्वतीय प्रदेश
दुर्गम असतात, तर वाळवंटात साधनसंपत्ती व पाणी अभावानेच आढळते. जगाच्या वेगवेगळ्या
भागांत हवामानातही वेगळेपण असते. काही प्रदेश अतिउष्ण किंवा अतिशीत असतात. याउलट काही
भागात मान्सून स्वरूपाचे हवामान असते, तर काही भागात थंड आल्हाददायक हवामान असते. याशिवाय
मृदा, पाण्याची उपलब्धता, वनांचे प्रदेश यांतही प्रदेशाप्रदेशांत फरक असतो. आर्थिक
विकासाची पातळी, दळणवळणाच्या सोयी, नागरीकरण, त्यांचे स्वरूप प्रदेशांनुसार भिन्न असते.
या सर्व कारणांमुळे जगातील लोकसंख्येचे वितरण असमान आहे.
(११) जगातील विषुववृत्तीय वनांचे
प्रदेश विरळ लोकवस्तीचे आहेत.
'महत्त्वाचे मुद्दे : (१) अतिशय उष्ण व दमट हवामान ( २ ) रोगट हवा (३) घनदाट
वने (४) विकासावरील मर्यादा.
उत्तर : विषुववृत्तीय वनांचा प्रदेश हा जगातील एक प्रमुख विरळ लोकवस्तीचा
प्रदेश आहे. अतिशय उष्ण आणि दमट हवामान, जास्त आर्द्रतेमुळे रोगट हवा,
जवळजवळ रोजच पडणारा मुसळधार पाऊस,
घनदाट वने आणि विषारी कीटक यांमुळे या प्रदेशात मानवी वस्तीत मर्यादा पडतात. याशिवाय
शेती, खाणकाम उद्योग, वाहतूक या व्यवसायांच्या विकासावरही मर्यादा पडतात. या सर्व कारणांमुळे
विषुववृत्तीय वनांचे प्रदेश विरळ लोकवस्तीचे आहेत.
(१२) आशिया खंडाची लोकसंख्या घनता
सर्वाधिक आहे.
/ महत्त्वाचे मुद्दे : (१) मान्सून हवामानाचा प्रभाव (२) नियमित पाऊस व पीक
(३) नद्यांची सुपीक खोरी (४) हवामान विविधता (५) विपुल खनिजसंपत्ती,
उत्तर : जगातील सुमारे ६० टक्के लोकसंख्या आशिया खंडात आढळते. मान्सून
पर्जन्य हे याचे वैशिष्ट्य आहे. दरवर्षी नियमित पडणाऱ्या पावसामुळे किमान एक तरी पीक
हमखास मिळते व पाण्याची उपलब्धता वाढते. आशिया खंडात सिंधू, गंगा, यांगत्से यांसारख्या
महत्त्वाच्या नदयांची सुपीक मैदानी खोरी आहेत. याशिवाय या नदयांच्या मुखाशी त्रिभूज
प्रदेश आहेत. आशिया खंडात विविध भागांत हवामानविषयक विविधताही आढळते. उष्ण व समशीतोष्ण
हवामान पिकाच्या वाढीस उपयुक्त पडते. चीन, भारत, बांग्लादेश हे देश आशिया खंडात असून,
जगाच्या ३७ टक्के एवढी लोकसंख्या केवळ या देशांतच आहे. सिंधू संस्कृती व यांगत्से संस्कृतीचा
विकास आशियातच झाला. त्यामुळे लोकसंख्येला फार पूर्वीपासून येथे स्थैर्य प्राप्त झाले.
या सर्व कारणांमुळे आशिया खंडाची लोकसंख्या घनता सर्वाधिक आहे.