प्रकरण २ लोकसंख्या भाग २ : भौगोलिक कारणे लिहा
भौगोलिक कारणे लिहा : (प्रत्येकी ३ गुण)
maharashtra state board geography bhugol important questions and answers marathi medium
प्रकरण २ लोकसंख्या : भाग २
(१) विकसित राष्ट्रांमध्ये शेती व्यवसायात गुंतलेल्या
लोकांची संख्या कमी आहे. (जुलै २२)
/ महत्त्वाचे मुद्दे : (१) आर्थिक विकासाची सर्वोच्च पातळी (२) आधुनिक तंत्रज्ञान
(३) औदयोगिकीकरण (४) नागरीकरण (५) रोजगाराच्या अनेकविध संधी (६) कमी लोकसंख्येतही उत्तम
शेती व्यवसाय शक्य.
उत्तर : विकसित देशांमध्ये कार्यशील लोकसंख्येपैकी सर्वाधिक लोकसंख्या
ही द्वितीयक, तृतीयक आणि चतुर्थक व्यवसायांत आढळते. देशाचा आर्थिक विकास झाला असल्यामुळे
तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर, औदयोगिकीकरण आणि नागरीकरण यांमुळे या व्यवसायांत रोजगाराच्या
अधिक संधी असतात. त्याच वेळेस आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीसारख्या प्राथमिक
व्यवसायात कमी लोकसंख्येच्या जोरावरही तो उत्तम प्रकारे केला जातो आणि भरपूर उत्पन्न
मिळवले जाते. या सर्व कारणांमुळे विकसित राष्ट्रांमध्ये शेती व्यवसायात गुंतलेल्या
लोकांची संख्या कमी आहे.
(२) लोकसंख्येतील साक्षरतेचे प्रमाण
हे देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचे द्योतक असते.
/ महत्त्वाचे मुद्दे : (१) जास्त साक्षरता - उत्तम राहणीमान (२) जास्त साक्षरता-
वाढती कार्यकुशलता (३) जास्त साक्षरता- विविध व्यवसाय संधी (४) जास्त साक्षरता-आर्थिक
प्रगती (५) जास्त साक्षरता-सामाजिक अभिसरण व सामाजिक विकास.
उत्तर : जसे साक्षरतेचे प्रमाण वाढत जाते, तसा लोकांच्या राहणीमानाचा
दर्जा सुधारतो. स्त्रियांनाही समाजात चांगला दर्जा प्राप्त होतो. साक्षरतेमुळे मनुष्याची
कार्यकुशलता वाढते आणि त्यामुळे प्राथमिक व्यवसायाव्यतिरिक्त त्याला द्वितीयक व तृतीयक
व्यवसायांतील संधीही मिळू शकतात. साक्षरतेच्या प्रमाणाचा व्यक्तीच्या आर्थिक प्रगतीशीही
थेट संबंध आहे आणि याचप्रमाणे देशाच्या आर्थिक विकासाचा लोकांच्या साक्षरतेशीही थेट
संबंध आहे. साक्षरता जेवढी जास्त तेवढी देशाच्या विकासाची शक्यता जास्त आणि त्याचप्रमाणे
देशाच्या विकासाचे प्रमाण तेवढे जास्त असते. त्याप्रमाणे शैक्षणिक सुविधांची उपलब्धता
आणि शासकीय धोरण यांचाही प्रभाव साक्षरतेवर होतो. एका अर्थी लोकसंख्येची साक्षरता आणि
देशाचा सामाजिक, आर्थिक विकास हे परस्परपूरक आहेत. इतकेच नव्हे तर, साक्षरता ही देशाच्या
आर्थिक विकासाचे कारण व परिणाम असे दोन्ही घटक आहेत असे म्हणता येईल.
(३) स्थलांतर हे नेहमीच कायमस्वरूपी
असते असे नाही. (सप्टें. २१)
/ महत्त्वाचे मुद्दे : (१) प्रतिकूल प्राकृतिक, राजकीय, सामाजिक घटक (२) अपकर्षक
घटक (३) सक्तीचे स्थलांतर (४) अनैच्छिक (५) म्हणून कायमस्वरूपी नाही.
उत्तर : एखादया ठरावीक ठिकाणी कायम वस्ती करून राहणे हा सध्या मानवाचा
स्थायिभाव झाला आहे. त्यामुळे स्थलांतर हा घटकच मुळात कुठल्यातरी कारणामुळे व्यक्तीस
एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यास भाग पाडतो. कारण काही वेळेस आकर्षणही असते. रोजगाराची
संधी, उत्तम राहणीमान, आल्हाददायक हवामान यांसारख्या काही आकर्षक कारणांमुळे व्यक्ती
स्वतःहून स्थलांतरित होते. त्यामुळे असे स्थलांतर बहुतांशी कायमस्वरूपी असते. मात्र,
आकर्षणापेक्षाही अपकर्षक कारणामुळे होणारे स्थलांतर व्यक्तीच्या इच्छेविरुद्ध असते.
नैसर्गिक आपत्ती, सामाजिक संघर्ष किंवा कलह, देशाच्या किंवा प्रदेशाच्या फाळणीसारखी
राजकीय कारणे अशा
अपकर्षणांमुळे जेव्हा स्थलांतर होते,
तेव्हा असे स्थलांतर हे कायमस्वरूपी असते असे नाही. त्यामुळेच प्रत्येक स्थलांतर हे
नेहमीच कायमस्वरूपी असत नाही.
(४) स्थलांतरामुळे शहरात अनेक समस्या निर्माण झाल्या
आहेत.
/ महत्त्वाचे मुद्दे : (१) लोकसंख्या (२) अतिक्रमण (३) बेकारी (४) असामाजिक
घटना (५) वाहतूक कोंडी (६) प्रदूषण.
उत्तर : स्थलांतरामुळे प्रामुख्याने शहरात कार्यकुशल लोकसंख्येचे प्रमाण वाढते. हे स्थलांतर प्रामुख्याने कार्यशील अशा पुरुष लोकसंख्येचे जास्त असते. त्यामुळे शहरीकरणाचा वेग वाढतो. शहरांची लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढते. या वाढत्या लोकसंख्येला पुरेशा सोयी-सुविधा, घरे, वाहतूक साधने, वैदयकीय आणि शैक्षणिक सोयी इत्यादी पुरवण्यात शहरे कमी पडतात. वाढत्या लोकसंख्येमुळे घरांच्याही किमतीत प्रचंड वाढ होते आणि त्यामुळे शहरांमध्ये झोपडपट्ट्यांची निर्मिती होते. काळाच्या ओघात सतत वाढणाऱ्या स्थलांतरामुळे शहरांमध्येच बेकारी वाढते. बेकारीमुळे शहरांमध्ये सामाजिक संघर्ष, अनैतिक व्यवसाय आणि गुन्हेगारीत वाढ होते. अशा प्रकारे स्थलांतरामुळे शहरात अनेक समस्या निर्माण होतात.