पुढील
विधाने
चूक की बरोबर
ते सांगून
चुकीचे
विधान
बरोबर
करून
पुन्हा
लिहा
आणि विधान
बरोबर
असल्यास,
त्याचे
कारण
सांगा
/ स्पष्टीकरण दया :
प्रकरण १ : लोकसंख्या : भाग १
(१) भारत लोकसंख्येच्या दुसऱ्या टप्प्यांतून जात आहे.
उत्तर :
हे विधान चूक आहे.
स्पष्टीकरण : भारत सध्या लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यातून जात आहे.
(२) जन्मदर कमी असूनही लोकसंख्या वाढू शकते.
उत्तर :
हे विधान बरोबर आहे.
स्पष्टीकरण : लोकसंख्या संक्रमणाच्या चौथ्या टप्प्याच्या अखेरीस जन्मदर खूप कमी होतो, मात्र मृत्युदर तर त्याहूनही कमी होतो, त्यामुळेच जन्मदर कमी असूनही लोकसंख्या वाढू शकते. अर्थात ही वाढ खूप अल्प असते.
प्रकरण २ : लोकसंख्या : भाग २
(३) दुष्काळ हे स्थलांतराचे अपकर्षक कारण आहे.
उत्तर :
हे विधान बरोबर आहे.
स्पष्टीकरण : दुष्काळामुळे चारा, पाणी यांच्या अभावामुळे अनिच्छेने स्थलांतर करावे लागते, म्हणून हे अपकर्षक कारण आहे.
(४) विकसित देशांचा लोकसंख्या वय-लिंग मनोरा उभ्या स्तंभाच्या स्वरूपात दिसतो.
उत्तर :
हे विधान बरोबर आहे.
स्पष्टीकरण : कमी जन्मदर त्यामुळे मनोऱ्याचा तळ अरुंद, तर कमी मृत्युदर त्यामुळे आयुर्मान जास्त व मनोऱ्याच्या वरील भागही संतुलित; यामुळे हा मनोरा स्थिरावलेला मनोरा असून तो स्तंभासारखा उभा दिसतो.
प्रकरण ३ : मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन
(५) उपनगरे व महानगरे यांचा काहीही परस्परसंबंध नसून, ती मानवी वस्तीची स्वतंत्र उदाहरणे आहेत.
उत्तर :
हे विधान चूक आहे.
स्पष्टीकरण : महानगरांची वाढ होते. रोजगार व अन्य सेवा-सुविधांमुळे येथे लोकसंख्या स्थलांतरित होते व ही वाढती लोकसंख्या महानगरांच्या सीमावर्ती भागात, झालर क्षेत्रात स्थायिक होते. त्यातूनच नवीन नगरे, शहरे उदयास येतात; मात्र ती आपल्या विविध गरजा, व्यवसाय व उदयोगधंदयांसाठी मूळ महानगरावर अवलंबून असल्याने, ती स्वतंत्र शहरे नसून ती मूळ महानगराची उपनगरे म्हणूनच वाढतात.
(६) नगरांच्या वाढीबरोबर त्यांची कार्येही वाढत / बदलत जातात.
उत्तर : हे विधान बरोबर आहे.
स्पष्टीकरण : नगरांची जसजशी वाढ होत जाते, तसतशी लोकसंख्या
वाढते. भूमी उपयोजन बदलत जाते. बांधकाम क्षेत्रात वाढ होते. द्वितीयक व तृतीयक सेवाक्षेत्रे, वैदयकीय, शिक्षण, व्यापार, वाहतूक, उद्योग, मनोरंजन, दळवळण इत्यादी विविध व्यवसायांची संख्या व प्रमाण वाढत जाते व असे नगर बहुकार्याचे नगर / शहर बनते.
प्रकरण ४ : प्राथमिक आर्थिक क्रिया
(७) शिकारीवर बंदी घालण्यात आली आहे.
उत्तर : हे विधान बरोबर आहे.
स्पष्टीकरण : अन्नाचे आता विविध स्रोत उपलब्ध आहेत. शिवाय पर्यावरण व वन्यजीव यांसंबंधी जनजागृती वाढत आहे. त्यामुळे जगातील बहुतांश सर्वच देशांनी शिकारीवर बंदी घातली आहे.
(८) विषुववृत्तीय वनांच्या प्रदेशात लाकूडतोडीचा व्यवसाय उत्तम प्रकारे विकसित झाला आहे.
उत्तर : हे विधान चूक आहे.
स्पष्टीकरण : अतिउष्ण, दमट, रोगट हवामान, उंच वृक्ष, टणक लाकूड, कमी लोकसंख्या, अविकसित देश-प्रदेश इत्यादी कारणांमुळे विषुववृत्तीय वनांच्या प्रदेशात लाकूडतोडीचा व्यवसाय विकसित झाला नाही.
(९) मंडई शेती हा प्रकार प्रामुख्याने मोठ्या शहरांजवळ आढळतो. उत्तर : हे विधान बरोबर आहे.
स्पष्टीकरण : मोठ्या शहरांतील जास्त लोकसंख्येच्या दूध, भाजी, फळे, फुले या दैनंदिन गरजांची पूर्तता शहरांजवळच्या कृषी क्षेत्रातून केली जाते.
प्रकरण ५ : द्वितीयक आर्थिक क्रिया
(१०) उद्योगांचे वितरण सर्वत्र एकसमान असते.
उत्तर : हे विधान चूक आहे. स्पष्टीकरण : उद्योगांची निर्मिती व स्थानिकीकरण यांवर हवामान, कच्चा माल, भांडवल, तंत्रज्ञान इत्यादी विविध घटक परिणाम करतात. हे घटक सर्वत्र समान नसतात. साहजिकच उद्योगांचे वितरणही सर्वत्र असमान असते.
(११) कोकणात फळप्रक्रिया उद्योग स्थापित झालेले आढळतात.
उत्तर : हे विधान बरोबर आहे.
स्पष्टीकरण : कोकणात आंबा, काजू, फणस, कोकम अशा विविध फळांवर तेथेच प्रक्रिया करणाऱ्या अनेक उद्योगांची स्थापना केली आहे; कारण हा उदयोग नाशिवंत कच्च्या मालावर प्रक्रिया करणारा उद्योग असल्याने फळ उत्पादक क्षेत्रातच हे उदयोग स्थापित होऊ शकतात.
(१२) धनबाद या खनिजबहुल क्षेत्रात लोह-पोलाद कारखाने आढळतात.
उत्तर : हे विधान बरोबर आहे.
स्पष्टीकरण : भारतीय पठारावरील स्थान, खनिजांचे समृद्ध साठे, वाहतूक साधनांचा विकास अशा विविध पोषक घटकांमुळे भारतीय पठारांवरील धनवाद या खनिजबहुल क्षेत्रात लोहपोलाद कारखाने आढळतात.
(१३) मध्य ऑस्ट्रेलिया उद्योग विकासात अग्रेसर आहे.
उत्तर : हे विधान चूक आहे.
स्पष्टीकरण मध्य ऑस्ट्रेलिया हा विस्तीर्ण वाळवंटी भाग आहे, तसेच येथे वाहतूक सुविधांचा अभाव असून, लोकसंख्याही कमी आहे व मनुष्यबळाचा तुटवडा आहे. मध्य ऑस्ट्रेलियात उदयोगांचा पुरेशा प्रमाणात विकास झालेला नाही.
प्रकरण ६ : तृतीयक आर्थिक क्रिया
(१४) भौगोलिक विविधता व्यापारास मारक ठरते.
उत्तर : हे विधान चूक आहे.
स्पष्टीकरण : प्रत्यक्षात भौगोलिक विविधता ही व्यापारास कारणीभूत ठरते. त्यामुळे उत्पादित क्षेत्रातून मागणी असणाऱ्या क्षेत्रात वस्तू व सेवांचा व्यापार होतो.
(१५) हवाई वाहतुकीचे प्रमाण वाढत आहे.
उत्तर : हे विधान बरोबर आहे.
स्पष्टीकरण : अतिशय जलद प्रवास दुर्गम प्रदेशांना अत्यंत उपयुक्त, आपत्ती व्यवस्थापनात मोलाची कामगिरी, नाशवंत व मूल्यवान वस्तूंच्या व्यापारास पूरक व पर्यटन क्षेत्रास अत्यंत उपयुक्त अशा हवाई वाहतुकीचे प्रमाण जगात सर्वत्र वाढत आहे.
प्रकरण ७ प्रदेश व प्रादेशिक विकास
(१६) 'कोकण हा प्राकृतिक घटकांच्या आधारे निश्चित केलेला प्रदेश आहे. '
उत्तर : हे विधान बरोबर आहे.
स्पष्टीकरण : पश्चिमेस अरबी समुद्र ( प्राकृतिक घटक) व पूर्वेस सह्याद्री पर्वतरांग (प्राकृतिक घटक) या दरम्यानचा चिंचोळा प्रदेश म्हणजे कोकण हा महाराष्ट्राचा प्राकृतिक प्रदेश आहे.
(१७) हिमालयीन पर्वतीय प्रदेशाचा फारसा विकास झालेला नाही.
उत्तर : हे विधान बरोबर आहे.
स्पष्टीकरण : प्रदेशाच्या विकासावर प्राकृतिक रचनेचा परिणाम होतो. हिमालयाच्या उंच पर्वतरांगा, तीव्र उतार, भूकंप प्रवण क्षेत्र कमी लोकसंख्या, दुर्गम प्रदेश इत्यादी कारणांमुळे हिमालयीन पर्वतीय प्रदेशाचा फारसा विकास झालेला नाही.
प्रकरण ८ : भूगोल : स्वरूप व व्याप्ती
(१८) भूगोल अभ्यासकास संगणकाचे ज्ञान असणे गरजेचे नाही.
उत्तर : हे विधान चूक आहे.
स्पष्टीकरण : काळाच्या प्रवाहात, आधुनिक तंत्रज्ञानामुळे भूगोल अभ्यासाची तंत्रे बदलली आहेत. आता केवळ निरीक्षण व नोंदी एवढ्यापुरतेच भूगोल अभ्यासाचे स्वरूप मर्यादित राहिले नसून विदा संकलनात उपग्रहांचे महत्त्व, विदेचे सांख्यिकीय विवेचन, नकाशा काढणे, भूसर्वेक्षण इत्यादी विविध तंत्रांत संगणकाचा वापर अत्यावश्यक झाला आहे. त्यामुळे भूगोल अभ्यासकास आता संगणकाचेही ज्ञान असणे गरजेचे आहे.
(१९) भूगोल या विषयाचे स्वरूप स्थिर व अचल आहे.
उत्तर : हे विधान चूक आहे.
स्पष्टीकरण : पृथ्वीवरील विविध भौगोलिक घटना व घडामोडींचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे भूगोल आहे. पृथ्वीवर सतत काही ना काही भौगोलिक घटना व घडामोडी घडतच असतात व त्यात कार्य-कारण भाव व सातत्य आढळते. तसेच या सर्व घटना व घडामोडींचा प्रभाव मानवीजीवन व मानवी क्रियांवरही होतो व त्याचाही अभ्यास भूगोल विषयात केला जातो. म्हणूनच भूगोल विषय हा स्थिर व अचल नसून तो गतिशील आहे.